Monday, September 16, 2024
Homeकोल्हापूरमुश्रीफांना जागा दाखवणार, समरजीतला मंत्री करणार; शरद पवारांचा गैबी चौकातून कागलकरांना शब्द

मुश्रीफांना जागा दाखवणार, समरजीतला मंत्री करणार; शरद पवारांचा गैबी चौकातून कागलकरांना शब्द

कोल्हापूर : कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही, तसा इथला इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा शरद पवारांनी हसन मुश्रीफांना दिला. समरजीत घाटगेंना तुम्ही निवडून द्या, ते फक्त आमदार राहणार नाहीत, त्यांना मोठी संधी देणार असा शब्द शरद पवारांनी कागलकरांना दिला. कागलच्या गैबी चौकात समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

 

समरजीत घाटगेंना मोठी संधी देणार

शरद पवार म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर समरजीत घाटगेंना विधानसभेवर पाठवा. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर समरजीत घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, त्यांना आवश्यक काम करण्यासाठी मोठी संधी देणार. हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून होता.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर समरजीत घाटगेंना मंत्री करणार असल्याचे सूतोवाच शरद पवारांनी दिलेत. कागलमध्ये लाल दिव्याची परंपरा कायम राहण्याचे संकेतही त्यांनी दिले.

 

मुश्रीफ लाचार, त्यांना जागा दाखवणार

कागलमधल्या सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही सर्वकाही दिलं. पण संकट आल्यानंतर साथ सोडून भलत्याच्या मागे गेले. त्यांच्यावर ईडीच्या काही चौकशा सुरू केल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कुटुंबीयांतील भगिनींनी ईडीने आम्हाला गोळ्या घालाव्या अशी भूमिका घेतली. पण त्यांचा कुटुंबप्रमुख लाचार होऊन भ्रष्टाचाऱ्यांच्या दारी गेला. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही.

 

लाचारी स्वीकारणे कागलचा इतिहास नाही

संकट आल्यावर पळून जाणे, लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं शरद पवार म्हणाले. समरजीत घाटगेंचा पक्षप्रवेश ही परिवर्तनाची नांदी आहे. आता राज्यात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असंही शरद पवार म्हणाले.

 

कागलकर समरजीत घाटगेंच्या पाठीशी

या आधी अनेकदा गैबी चौकात सभा घेतल्या, पण आजची सभा ही वेगळी असून नजर जाईपर्यंत माणसांची गर्दी दिसतेय, शेवटचं टोक एसटी स्टँडपर्यंत आहे. त्यावरून कागलमधील तरूणापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनीच समरजीत घाटगेंच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चय केल्याचं दिसतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. सत्तेसाठी जर कुणी गायब झालं असेल तर त्याला शाहू महाराजांच्या विचाराच्या कोल्हापूरकरांनी धडा शिकवला, कधीही लाचार होणार नाही असा संदेश दिला असंही शरद पवार म्हणाले.

 

कुपेकर आणि मंडलिकांची आठवण आली

शरद पवार म्हणाले की, कागलमध्ये आल्यानंतर आज या प्रसंगी माझ्या दोन जुन्या सहकाऱ्यांची म्हणजे बाबासाहेब कुपेकरांची आणि सदाशिवराव मंडलिकांची आठवण येते. 1980 साली आपल्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते. नंतर त्यातील पाच सहा सोडले तर सगळे निघून गेले. कार्यकर्ते नव्हते, आमदार नव्हते. पण जिद्द होती. त्यामुळे पुन्हा एकदा पक्ष उभा केला. त्यावेळी पहिल्यांदा बाबासाहेब कुपेकर आणि मंडलिक आमच्यासोबत आले आणि पाच वर्षांत राजकारण बदललं. सत्तेसाठी जर कुणी गायब झालं असेल तर त्याला कोल्हापूरकरांनी धडा शिकवला, कधीही लाचार होणार नाही असा संदेश दिला.

 

आज महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून रोज त्याच्या बातम्या येतात. लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. पण केंद्र सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नसल्याचं सांगत शरद पवारांनी मोदी सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली.

 

ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला, वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला असं सांगितलं अशांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असं आवाहन शरद पवारांनी केलं.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -