Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगमहाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, 1.17 लाख कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात...

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, 1.17 लाख कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?

मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल (Panvel) परिसरात हे चार प्रकल्प येणार असून या माध्यमातून तब्बल 1.17 लाख कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पांमुळे संबंधित परिसरातील तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या चार प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्पाचा समावेश आहे. या माध्यमातून तब्बल 29 हजार नोकऱ्या (Jobs) उपलब्ध होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 

कोणत्या प्रकल्पांचा समावेश?

 

पनवेलमध्ये टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूहाकडून उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरु होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 58 हजार 763 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात 25 हजार 184 कोटी अशी एकूण 83,947 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून तब्बल 15 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

 

पुण्यात स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा एकात्मिक प्रकल्प सुरु होणार आहे. या प्रकल्पामध्ये 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 1000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा-किर्लोस्कर मोटार कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 21 हजार 763 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून साधारण 12 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

 

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेला चौथा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीमध्ये रेमंड लक्झरी कॉटन्सच्या या प्रकल्पात स्पिनिंग, यार्न डाइंग, व्हिव्हींग ज्यूट, व्हिव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटनचे उत्पादन होणार आहे. यामध्ये 188 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. या माध्यमातून साधारण 550 थेट नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -