राज्यात पुन्हा पावसाचे (Rain) वातावरण तयार झाले आहे, तर काही ठिकाणी पाऊस देखील पडला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसानं उघडीप दिली होती. पण आजपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या’ भागात पडणार जोरदार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, बीड, नांदेड यासह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
परभणीत अनेक दिवसांनंतर पावसाची जोरदार हजेरी
परभणीत अनेक दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह परिसरात मागच्या 1 तासापासून जोरदार पाऊस बरसतोय. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या काळात जोरदार पाऊस बरसत असल्याने जे सोयाबीन आणि कापुस अतिवृष्टींतून बचावला आहे, तो ही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झालीय.