हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 40-50 किमी ताशी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि सांगली जिल्ह्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.दुसरीकडे लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, नाशिक, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मान्सूनची चाल थबकल्यानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा 32 अंशाच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच पावसाचा इशारा देण्यात आल्याने उकाड्यापासून सुटका मिळण्याची शक्यता
आहे.