येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घोषित केली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन दोन दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप राज्यातील कोणत्याही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. त्यातच आता महायुतीतील एका नेत्याने भाजप की शिंदे गट यापैकी कोणाची यादी सर्वात आधी जाहीर होणार याबद्दल विधान केले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उमेदवारी यादीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
दोन टप्प्यात यादी जाहीर केली जाणार
महायुतीतील यादी लवकर जाहीर करणे गरजेचे आहे. आमच्या सर्व जागा या जवळपास ठरल्या आहेत. पण काही जागांच्या अंतिम चर्चेसाठी महायुतीतील नेते दिल्लीत जाणार आहेत. महायुतीतील प्रत्येक पक्षांकडून दोन टप्प्यात यादी जाहीर केली जाणार आहे, असे शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार
महायुतीतील उमेदवारी यादी जाहीर करण्याबद्दल या पक्षातील तिन्हीही नेत्यांची चर्चा झाली आहे. येत्या 8 दिवसानंतर प्रत्येक नेत्यांचे दौरे ठरवण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन दिवसात यादी जाहीर केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले.
आमची यादी दोन दिवसात जाहीर होणार
यावेळी संजय शिरसाट यांनी भाजप यांच्याकडे जास्त जागा असल्याने त्यांची यादी आज किंवा उद्या जाहीर होईल. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची आमची यादी दोन दिवसात जाहीर केली जाईल, असे त्यांनी म्हटले.