दाना चक्रीवादळाच्या रुपानं ओडिशावर मोठं संकट घोंगावत आहे.ओडिशाच्या समुद्र किनारी प्रदेशाच्या दिशेन हे चक्रीवादळ गतीनं सरकत असून याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दाना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरदरम्यान ओडिशासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ओडिशामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
दान चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा बालासोर, भद्रक, केंद्रपाड़ा, जगतसिंहपुर, जाजपूर,पुरी आणि खोरधा या जिल्ह्यांना बसणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
सध्या या चक्रीवादळाचा वेग हा ताशी 100 किमी इतका आहे, मात्र त्यामध्ये वाढ होऊन हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनारी भागांमध्ये धडकण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून,मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात
आलं आहे.