गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा वारू जोरदार उधळला आहे. सोन्या पाठोपाठ चांदीने पण मोठी भरारी घेतली. पण अचानक सोन्याचा भाव कोसळला. सोन्याच्या दरात मोठी पडझड झाली. या घसरणीने खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दिवाळीचा मुहूर्त साधत चांदी तळपली. चांदी नवनवीन विक्रमाला गवसणी घालत आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत चांदी सुस्तावली होती. चांदीने ही मरगळ झटकली. चांदीने मोठा पल्ला गाठला आहे. पण अचानक या दरवाढीला ब्रेक लागला. चांदीत ही घसरण दिसली. आता काय आहेत या मौल्यवान धातुचे भाव?
सोन्यात 600 रूपयांची पडझड
मागील आठवड्यात सोने 1600 रुपयांनी महागले होते. तर या आठवड्यात सोन्याने 650 रुपयांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर सोन्याचा भाव कोसळला. 21 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी वाढले. 23 ऑक्टोबरला 430 रुपयांची उसळी आली. तर 24 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 600 रूपयांनी घसरला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत मोठी घसरण
मागील आठवड्यात चांदी 3,000 रुपयांनी वधारली होती. या आठवड्यात चांदीने 4,500 रुपयांची उसळी घेतली. त्यानंतर आता किंमतीत घसरण आली आहे. 21 ऑक्टोबरला 1500 रुपये, 22 ऑक्टोबर रोजी 1,000, 23 ऑक्टोबर रोजी 2,000 रुपयांनी चांदी महागली. तर 24 ऑक्टोबर रोजी चांदी 2,000 रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,246, 23 कॅरेट 77,933, 22 कॅरेट सोने 71,673 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,685 रुपये, 14 कॅरेट सोने 45,774 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,493 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.