मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी काल, गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे ट्रॅक्टर, पिकअप, स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे 16 कोटींची मालमत्ता आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार छगन भुजबळ यांच्याकडे किती आहे संपत्ती?
एकूण संपत्ती तरी किती?
मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता 16 कोटी 53 लाख रुपये आहे. मीना भुजबळ यांच्या नावे 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रुपयांची जंगम तर 86 लाख 21 हजार 572 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर 21 लाख 10 हजार 250 रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 32 लाख 76 हजार रुपयांचे 455 ग्रॅम सोने, 4 लाख 37 हजारांची 5,150 ग्रॅम चांदी तर 22 लाख 5 हजारांच्या इतर मौल्यवान वस्तू आहेत. मीना भुजबळ यांच्या नावावर एक पिकअप वाहन आहे.
छगन भुजबळ यांच्याकडे एकूण 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर 24 लाख 56 हजारांचे कर्ज आहे. भुजबळ यांच्या नावे दोन ठिकाणी शेतजमीन, दोन घरं आहेत. 3 लाख रुपये त्यांनी न्यायालयात अनामत रक्कम म्हणून भरले आहेत. भुजबळ यांच्याकडे 585 ग्रॅम सोनं आहे. त्यांच्या नावावर एक ट्रॅक्टर आहे.
गेल्या पाच वर्षांत किती झाली वाढ
गेल्या पाच वर्षांत 2019 नंतर छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत 82 लाखांची वाढ दिसून आली. भुजबळ यांच्याकडे 11 कोटी 20 लाख 41 हजारांची मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावावर 16 कोटी 53 लाखांची मालमत्ता आहे. मागील पाच वर्षांत भुजबळ यांच्या मालमत्तेत 82 लाखांची भर पडली तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 3 कोटी 35 लाख रुपयांची भर पडली.
2019 मध्ये त्यांच्याकडे 1 लाख 3 हजार 160 रुपयांची रोख, तर पत्नीकडे 51,700 रुपयांची नगद रक्कम होती. तर चार बँकांमध्ये 46 लाख 62 हजार 52 रुपयांच्या ठेवी आहेत. पत्नीकडे दोन बँकांमध्ये अनुक्रमे 5 लाख 89 हजार 470 रुपये तर 1 लाख 64 हजार 170 रुपये आहेत. बाँड्स शेअर्स मिळून 1 लाख 62 हजार 52 रुपये तर पत्नीकडे 25 लाख 25 हजार 100 रुपये आहेत.