आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं. मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने रोहित शर्मा याच्या जागी गुजरात टायटन्समधून आलेल्या हार्दिक पंड्या याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत टीम मॅनेजमेंटवर सडकून टीका केली. नेटकऱ्यांनी हार्दिक पंड्या याला अनेक महिने ट्रोल केलं. हार्दिकला सामन्यादरम्यान या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. रोहितकडून कॅप्टन्सी काढून घेतल्याने मुंबई आणि हिटमॅनच्या चाहत्यांनी नको त्या शब्दात आपला राग व्यक्त केला. तसेच रोहितने पुढील हंगामात मुंबईची साथ सोडावी, असंही काही चाहत्यांनी म्हटलं.
त्यानंतर आता आयपीएल 18 व्या मोसमासाठी आज 31 ऑक्टोबरला एकूण 10 संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळे आता रोहित मुंबईकडून खेळणार की नाही? हे स्पष्ट झालं आहे. मुंबई इंडियन्स टीमने एकूण 5 खेळाडूंना रिटेन अर्थात कायम ठेवलं आहे. मुंबईचे हे पाचही कॅप्ड खेळाडू आहेत. मुंबईने नियमानुसार जास्तीत जास्त 5 कॅप्ड खेळाडूच रिटेन केले आहेत. हे 5 खेळाडूही पहिल्या फळीतले आहेत
रोहित आहे की नाही?
मुंबई इंडियन्सच्या या रिटेंशन यादीमुळे रोहित शर्मा याच्याबाबतची भूमिका स्पष्ट झाली आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या 18 व्या मोसमात मुंबईकडूनच खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित मुंबईच्याच त्याच जर्सीत खेळताना दिसणार आहे. कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर रोहितने दुसऱ्या टीमकडून खेळावं, त्याचा मुंबईच्या जर्सीतला हा अखेरचा हंगाम असेल, अशा अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र या रिटेन्शननंतर या सर्व चर्चा फोल ठरल्या आहेत.
पलटणने रिटेन केलेले 5 खेळाडू
मुंबईने कॅप्टन हार्दिक पंड्या याच्यासह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या 5 जणांना कायम ठेवलं आहे. मात्र पलटणने जसप्रीत बुमराहसाठी इतर 4 खेळाडूंपेक्षा अधिक रक्कम मोजली आहे. मुंबईने बुमराहसाठी 18 कोटी खर्चले आहेत. तर हार्दिक आणि सूर्याला प्रत्येकी 16 कोटी 35 लाख रुपये मिळणार आहेत. रोहितला 16 कोटी 30 लाख रुपये मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर तिलक वर्मा याला 8 कोटी रुपये मिळणार आहेत.