राज्यातील शिक्षकांचे दरवर्षी लांबणारे बदल्यांचे गुर्हाळ आता बंद होणार आहे. यापुढे एकाच वेळापत्रकानुसार संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होणार असून 31 मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
बदली प्रक्रियेत एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्याचे कार्यासन अधिकारी नितीन पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी तयार केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येते.
परंतु, नागपूर उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेवरील 25 ऑक्टोबरच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसारच कार्यान्वित असावे असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार यापुढे दरवर्षी राबविण्यात येणार्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी. त्यानंतर दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी. वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या संबंधित मुख्य कार्यकारी
कार्यकारी अधिकार्यांची राहणार आहे.
संबंधित वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरीत्या सुरू ठेवण्याची जबाबदारी मे. विन्सीस आयटी प्रा. लि. पुणे या कंपनीकडे राहील. एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी संबंधित वेळापत्रक लागू राहणार नाही. तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी, असे देखील नमूद केले आहे.
असे आहे वेळापत्रक
शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे –
1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी
उपलब्ध रिक्त पदे निश्चित करणे
– 1 ते 31 मार्च
बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सीस कंपनीस उपलब्ध करून देणे
– 1 ते 20 एप्रिल
समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे
– 21 ते 27 एप्रिल
शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे
– 28 एप्रिल ते 9 मे
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे
– 10 ते 21 मे
विस्थापीत शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे
– 22 ते 27 मे
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे
28 मे ते 31 मे.