Saturday, December 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरच्या राजकारणात आता खानविलकरांची एन्ट्री

कोल्हापूरच्या राजकारणात आता खानविलकरांची एन्ट्री

दिग्विजय खानविलकरांचे संपूर्ण राजकीय(politics) आयुष्य आधी राष्ट्रीय काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. करवीर मध्ये पराभव झाल्यानंतर ते राजकीय नैराश्यात गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही विशेषतः शरद पवार यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन केले नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव विश्वविजय खानविलकर यांनी चालवला नाही.

त्यामुळे खानविलकर कुटुंब हे राजकारणापासून(politics) अलिप्त राहिले होते. त्यांचा गटही तसा राहिला नाही. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात या कुटुंबाचे नावही घेतले जात नव्हते. पण रविवारी अचानक या कुटुंबाची कोल्हापूरच्या निवडणूक राजकारणात एन्ट्री झाली. आणि त्यांनी चक्क महायुती सरकारचे गोडवे गात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर करून सर्वांच्या भुवया उंचावून ठेवल्या.

 

 

दिग्विजय खानविलकर यांनी ते हयात असताना विश्वविजय यांना राजकारणात आपला राजकीय वारसदार म्हणून लॉन्च केले नाही. त्यांनाही राजकारणात फारसा रस नव्हता. दिग्विजय यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती राजलक्ष्मी या सुद्धा राजकारणात नव्हत्या. संधी असूनही त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. दिग्विजय यांची सावली म्हणूनच त्या वावरल्या. मग असे अचानक जाहीरपणे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे त्यांच्या मनात का आले? राजघराण्यांने मधुरिमा राजे यांच्या विषयी घेतलेल्या राजकीय निर्णयाशी त्याचा काही संबंध आहे काय?

 

मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती ह्या दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या होत. त्यांच्यात अगदी सुरुवातीपासून पॉलिटिकल स्पार्क होता आणि आहे. राजकीय चमक धमक आहे. कोल्हापूर उत्तर मधून त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्जही दाखल केला होता. पण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत त्यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. हा निर्णय तसा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी घेतला होता. त्यांनीच मधुरिमा राजे यांना उमेदवारी मागे घेण्याचा आदेश दिला होता अशी चर्चा उघडपणे सुरू झाली होती. मधुरिमा राजे यांनाही विधानसभेची निवडणूक मनापासून लढवायची इच्छा होती. तथापि “राजाज्ञा”पुढे त्यांचे काही चालले नाही.

 

 

मधुरिमा राजे यांनी घेतलेला उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय हा त्यांचा नव्हता, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना तो घेण्यास भाग पाडण्यात आले होते. आपल्या कन्येचे राजकीय(politics) महत्त्वकांक्षेचे पंख छाटण्यात आले या समजुतीतून आलेल्या रागातून खानविलकर कुटुंबाने हा राजकीय पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. आणि या चर्चेत तथ्य नाही असे म्हणता येणार नाही.

 

मधुरिमा राजे या सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. अशावेळी त्यांच्या मातोश्री राजलक्ष्मी आणि बंधू विश्वविजय यांनी महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा दिलेला आहे. केवळ पाठिंबा देऊनच खानविलकर कुटुंब थांबलेले नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महायुती सरकारचे भरभरून कौतुक केले आहे. लाडकी बहीण, लेक लाडकी, यासारख्या योजनांचा राज्यातील महिलांना फायदा होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजकारणापासून गेली अनेक वर्षे अलिप्त असलेल्या खानविलकर कुटुंबाने घेतलेल्या या राजकीय निर्णयाबद्दल सर्वसामान्य जनतेला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

आपली कन्या ही कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची सून आहे. आणि हे घराणे काँग्रेस पक्षाशी जोडलेले आहे. पण तरीही

खानविलकर कुटुंबाने काँग्रेसचा क्रमांक एकचा शत्रू असलेल्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मधुरिमा राजे छत्रपती यांच्या उमेदवारी मागे घेण्याच्या राजघराण्याच्या निर्णया विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी खानविलकर कुटुंबाने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

मधुरिमा राजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतली नसती, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील त्या महाविकास आघाडीच्या अर्थात काँग्रेसच्या उमेदवार(politics) असत्या तर खानविलकर कुटुंबाने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असता का? महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचे भरभरून कौतुक करण्याचे धाडस त्यांच्याकडून झाले असते काय? हे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

 

दिग्विजय खानविलकर हे करवीर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून गेले होते. जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी अपक्ष म्हणून करवीर मधून विधानसभेची निवडणूक लढवून त्यांनी खानविलकर यांना पराभूत केले होते. विशेष म्हणजे सतेज पाटील यांना तेव्हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासह सहा राजकीय पक्षांनी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते. याच सतेज पाटील यांनी मधुरिमा राजे छत्रपती यांना काँग्रेसचे उमेदवारी मिळावी म्हणून यशस्वी प्रयत्न केले होते. मधुरिमाराजे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली नसती तर सतेज पाटील यांना त्यांचे एकेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या दिग्विजय खानविलकर यांच्या या कन्येसाठी प्रचाराचे रान उठवावे लागले असते.

 

मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणूक रिंगणातून अचानक माघारी घेतल्याचे दुःख लपवून ठेवत खानविलकर कुटुंबाने अचानकपणे पुढे येऊन महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे. अर्थात त्यांच्या पाठिंब्याने महायुतीच्या उमेदवाराची ताकद किती वाढणार आहे हे सध्यातरी सांगता येत नाही. कारण खानविलकर कुटुंबाने त्यांचे उपद्रव मूल्य सिद्ध केलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -