तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीच्या जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याने थायलंडमधील फुकेत विमानतळावर १०० पेक्षा अधिक भारतीय प्रवासी ८० तासांपासून अडकून पडले आहेत.
यासंदर्भात प्रवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, हे विमान १६ नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. मात्र, सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या उड्डाणाला सहा तास उशीर होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर अनेक तास प्रतीक्षा केल्यानंतर आम्हाला विमानात बसविण्यात आले. मात्र, तासाभरानंतर विमानातून खाली उतरविले, असा आरोपही त्यांनी केला.
काही तांत्रिक कारणांमुळे विमान रद्द करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली. हॉटेलमधील निवास, भोजनासह प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.
तिकिटाचे पैसे देण्याचा पर्याय
थायलंडमधील फुकेत विमानतळावर अडकून पडलेल्या काही प्रवाशांची दुसऱ्या उपलब्ध विमानात सोय करण्यात आली. तसेच इतरांना तिकिटाचे संपूर्ण पैसे परत देण्याचा पर्याय देण्यात आला. आमचे प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे, असेही ‘एअर इंडिया’च्या निवेदनात म्हटले आहे.