छत्रपती संभाजीनगरमध्ये एका क्षुल्लक कारणास्तव एका अभियंत्याचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमधील कामाला असलेल्यांसोबत वाद झाल्यानंतर त्याचवेळी जेवणासाठी आलेल्या अभियंत्याला हॉटेलचा मालक समजून एका टोळक्याने चाकूने वार करून अभियंत्याचा खून केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जालना रोडवरील झाल्टा फाटा येथे यशवंत हॉटेलमध्ये काल (शुक्रवार दि. 6 डिसेंबर) रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राजू पेड्डी (वय 28, रा. राज ज्योती नगर उस्मानपुरा) असं मयत अभियंताचं नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष राजू पेड्डी याने अभियंतेचं शिक्षण घेतलं होतं. तो एका सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरी करतो. एका सॉफ्टवेअर कंपनीत तो घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत असल्यामुळे संभाजीनगर येथील आपल्या घरी थांबला होता. दरम्यान, संतोष राजू पेड्डी याच्या नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य हे हैदराबादला गेले होते. त्यामुळे संतोष हा घरी एकटाच होता. रात्री उशीरापर्यंत काम केल्यानंतर संतोष जेवण करण्यासाठी जालना रोडवर आला. तो झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये पोहोचला. त्याचवेळी हॉटेलमध्ये वेगळाच वाद सुरू होता.
हॉटेलमध्ये एका टोळक्याने जबरदस्ती जेवण मागिवलं होतं. त्यानंतर त्या टोळीने स्वतः फ्रीज उघडून थंड पेयाची बाटली घेतली. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांशी पैसे मागितल्यावर वाद सुरू झाला. त्याचवेळी संतोष हॉटेलमध्ये पोहोचला. तो फॉरच्यूनर कारमधून उतरून हॉटेलमध्ये चालत आला. संतोषची शरीरयष्टी बघून हॉटेल चालकाने आपल्याला मारण्यासाठी लोकं बोलवली आहेत, असा गैरसमज त्या टोळक्याचा झाला. त्याचवेळी क्षणाचाही विचार न करता टोळक्याने संतोष याच्यावर हल्ला केला. संतोषच्या छातीत चाकूने भोसकलं आणि तो रक्तबंबाळ झाला. त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र, या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिखलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
किरकोळ भांडणावरून जावयाने सासूच्या घराला लावली आग
पत्नी माहेरी गेली या कारणावरून जावयाने चक्क सासुरवाडीतील घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला आहे. या घटनेत घरातील काही साहित्य जळाल्याने नुकसान झालं आहे. ही घटना कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी सासूने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी जावई साहिल हनुमंत हाळंदे (वय 25, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे