क्रिकेट चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. अखेर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. पहिल्या दिवशी फक्त पहिल्या सत्रातील 13.2 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. ऑस्ट्रेलियाने या झालेल्या खेळात एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
बीसीसीआयकडून मोठी अपडेट
बीसीसीआयने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याचं सांगत उर्वरित 4 दिवसांबाबतही मोठी अपडेट दिली आहे. वाया गेलेल्या खेळाची भरपाई व्हावी, या उद्देशाने सामन्याची सुरुवात अर्धा तास आधी होणार आहे. तसेच किमान 98 षटकांचा खेळ करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सांगितलं आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात झाली. त्यानुसार, आता उर्वरित 4 दिवसांच्या खेळाला सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पहिल्या दिवशी काय झालं?
भारताने टॉस जिंकला. कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्वीनी आणि उस्मान ख्वाजा सलामी जोडी मैदानात आली. पहिल्या 5 षटकांचा खेळ निट झाला. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा खेळ सुरु झाला. त्यानंतर पुन्हा पाऊस आला. त्या पावसाने पूर्ण दिवस खाल्ला. क्रिकेट चाहत्यांना पाऊस थांबेल, अशी आशा होती. मात्र पाऊस आणि ओली खेळपट्टी या कारणांमुळे एकही बॉल टाकला जाऊ शकला नाही. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. ख्वाजा 47 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावांवर नाबाद आहे. तर नॅथनने 33 बॉलमध्ये 4 धावा केल्या आहे.
पहिला दिवस पावसाचा
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.