साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जून याच्यासाठी आजचा दिवस खास होता. पुष्पा 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान हैदराबादच्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेने जीव गमावला तर तिचा मुलगा जखमी झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काल ( शुक्रवा) दुपारी अल्लू अर्जून याला पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्याला 14 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आणि त्याची रवानगी चंचलगुडा जेलमध्ये झाली. मात्र त्याच्या वकिलांनी धावाधाव करत जामीन मिळवला, पण तरीही अल्लू अर्जुन याला एक रात्र तुरूंगात काढावीच लागली.अखेर आज सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली आणि तो घरी परतला. फक्त त्याचे चाहतेच नव्हे तर घरचे, कुटुंबीयही त्याची आतुरतेने वाट बघत होते. ‘पुष्पाभाऊ’ घरी पोहोचताच त्याच्या कुटुंबियांनी त्याचे शानदार स्वागत केले. सोशल मीडियावर त्याच्या ग्रँड वेलकमचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर सध्या अल्लू अर्जुन ट्रेंड करत आहे. जेलमध्ये एक रात्र घालवून बाहेर पडल्यावर त्याचे चाहतेच नव्हे तर कुटुंबियही खूप खुश होते. त्याच्या घरातच त्याचे शानदार स्वागत झाले, मुलं धावत वडिलांना बिलगली, पत्नीने भरल्या डोळ्यांनी मिठी मारली,आईनेही तिच्या लेकाची दृष्ट काढत गळाबेट घेतली, त्याच्या ग्रँड वेलकमचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
मुलांन कवेत घेतलं, पत्नीने साश्रू नयनांनी मारली मिठी
PTI ने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये अल्लू अर्जुन हा त्याच्या कुटुंबियांची भेट घेताना दिसतोय . तो घरी आल्याचे दिसताच त्याचा मुलगा धावत आला आणि वडिलांना मिठी मारली. मागून त्याची पत्नी आली, आणि साश्रू नयानांनी तिने पतीला मिठीत घेतलं.त्यानंतर अल्लू अर्जुन याने मुलीलाही जवळ घेतलं, कवेत घेतलं. त्यानंतर त्याने कुटुंबातील सर्व सदस्यांची भेट घेत त्यांना झप्पी दिली.
आईने दृष्ट काढली, मुलानेही चरणस्पर्श करत..
अल्लू अर्जुनची वृद्ध आई देखील आपल्या मुलाची घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत होती. तिचा मुलगा घरी येताच तिने आपल्या मुलाची दृष्ट काढली. अल्लूनेही खाली झुकून आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि मग आईसोबत घरात गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 105 (निर्दोष हत्या), 118(1) (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी काल म्हणजेच शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली होती.