‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. या कठीण काळात हिनाच्या कुटुंबीयांसोबतच आणखी एक व्यक्ती खंबीरपणे तिच्या पाठिशी उभी असल्याचं पहायला मिळालं. ही व्यक्ती म्हणजे हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल. हिना आणि रॉकी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हिनाच्या अत्यंत कठीण काळात रॉकी तिची साथ देत असून त्याचं अनेकांकडून कौतुक होत आहे. अशातच या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कॅन्सरवरील उपचारादरम्यान हिनाने रॉकीशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हिना-रॉकीचा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हिना आणि रॉकी यांनी सुंदर पोशाख परिधान केला आहे. त्याचसोबत टीव्हीवरील काही कलाकारसुद्धा सजून-धजून हिना-रॉकीच्या स्वागतासाठी तयार असल्याचं दिसतंय. तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, दीपिका कक्कर हे सर्वजण यात पहायला मिळत आहेत. इतकंच नव्हे तर दीपिका कक्कर ही ढोलच्या गजरात नाचतानाही दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या हिना आणि रॉकीचं औक्षण करून त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत. हे सर्वजण मिळून रॉकी आणि हिनाचं जंगी स्वागत करतात. हा व्हिडीओ पाहून हिना आणि रॉकीचा लग्नसोहळा पार पडल्याची जोरदार चर्चा आहे.
व्हिडीओमागील सत्य काय?
या व्हिडीओमध्ये जरी हिना आणि रॉकीच्या लग्नासारखाच सीन दिसत असला तरी हे दोघं खरोखरंच लग्नबंधनात अडकले नाहीत. हे दोघं नुकतेच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कुकींग शोमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले होते. या एपिसोडचा थीम हा लग्नसोहळ्याचा होता. त्यानुसार सेटची सजावट करण्यात आली असून हिना आणि रॉकीचं नवरा-नवरीप्रमाणे स्वागत करण्यात आलं आहे. हिनासोबत रॉकी सहसा स्क्रीनवर दिसत नाही. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा पहायला मिळतात. त्यामुळे या एपिसोडविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.