चैनीसाठी चोऱ्या करणाऱ्या चार जणांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये ओंकार नवनाथ डवरी (रा. उत्तूर, ता. आजरा) या चोरट्यासह तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचा प्रयत्न व तांब्याचे बंब चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत
त्यांच्याकडून ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अंबाई डिफेन्स कॉलनी येथील योगेश गायकवाड (वय ३५) यांची घराच्या दारात लावलेली दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करताना ओंकार डवरी व दोन अल्पवयीन सापडले. हा गुन्हा २४ मार्च रोजी घडला होता. या चोरट्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची कबुली देण्यात आली. यामध्ये २२ फेब्रुवारी रोजी जागृतीनगर येथून गीता शिंदे यांच्या घरासमोरील रिकाम्या जागेतील तांब्याचे दोन बंब चोरीला गेल्याचा गुन्हा उघडकीस आला.
संशयित चोरट्यांनी या गुन्ह्यांची कबुली केली. दरम्यान, चोरीस गेलेल्या मुद्देमालासह चोरट्यांचा शोध घेताना खबऱ्याकडून या चोरट्यांविषयी माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर ओंकार डवरीसह तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. ते सर्वजण चैनीसाठी चोऱ्या करत होते. त्यांच्याकडून दुचाकी व दोन तांब्याचे बंब मिळून ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील अल्पवयीन चोरटे वयाच्या आठव्या वर्षापासून चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे.