राज्यात सध्या उन्हाचा जोर कायम असून उष्णतेचा चटका नागरिकांना बसत आहे. मात्र दुसरीकडे, पावसालाही पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या काही तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही जारी केला आहे. तर मुंबईत आज(14 एप्रिल) आणि उद्या पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेपासून दिलासा देणारा पाऊस कधी बरसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. परिणामी बदलत्या वातावरणामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहे. अशातच नाशिकच्या येवल्यात काल (13 एप्रिल)सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. येवला तालुक्यातील राजापूर, पन्हाळसाठे या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडल्याने काढून ठेवलेला कांदा यात मोठ्या प्रमाणात भिजलाय. तर काही ठिकाणी उन्हाळी कांदा काढणी चालू असल्याने शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे एकच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल; टोमॅटोला पाच ते दहा रुपये प्रति किलो दर
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने टोमॅटोला गळती लागलीय. यातच टोमॅटोचे दर घसरले असून खत, बियाणे, मजुरी यासाठी केलेला खर्च देखील आता निघत नाहीये. टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी अशोक ढास यांनी एक एकर मध्ये दीड लाखांचा खर्च केला होता. मात्र ऐन तोडणी वेळी टोमॅटोचे दर कोसळल्याने ढास यांनी टोमॅटो बाजारात विक्रीसाठी देखील नेले नाहीत. दीड लाखांचा खर्च वगळून पीक काढण्यासाठी त्यांना 25 हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
विदर्भात विक्रमी तापमानाने जनजीवन विस्कळीत
विदर्भात सध्या सर्वत्र विक्रमी तापमानाने जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे लोकांचे चांगलेच हाल होतायेत. अकोल्यात पारा 44 अंशांवर गेल्याने अकोलेकर घरात बसून कुलरच्या थंडीचा सहारा घेतायेत. आता विक्रमी तापमानापुढे देवालासुद्धा कुलरचा आसरा घ्यावा लागत आहे… अकोल्याच्या मंदिरांमध्ये देवाच्या मुर्त्याना थंडावा देण्यासाठी विशेष सोय करावी लागतीये… अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कुलरची सोय करण्यात आलीये.