Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रलहान सुराग, मोठा शोध: 'सुतावरून स्वर्ग' म्हण पुन्हा खरी ठरली, तपासाच्या कौशल्याने...

लहान सुराग, मोठा शोध: ‘सुतावरून स्वर्ग’ म्हण पुन्हा खरी ठरली, तपासाच्या कौशल्याने खुनाचं गूढ उकललं

ग्रामीण भागात अद्यापही अनेक गुराखी दिवसभर जंगल भागात जनावरे चारण्याचे काम करतात. त्यांच्यातीलच रामू गुराखीही लवकर जंगलात जनावरे चारायला जाण्याच्या गडबडीत होता.

 

पोटाला मिळेल त्यादिवशी मजुरी करायची व इतर दिवशी रिकाम्या वेळेत जनावरांना जंगलात चारायला जायचे हा त्याचा दिनक्रम होता. आज त्याला शंकर अण्णांकडे दुपारनंतर कामाला जायचे होते. तसं शंकर अण्णांकडे घरी त्याच्यासाठी नेहमीच काम असायचे, तसे रामाच्या मापाचे काम आज निघाल्याने त्यांनी रात्रीच त्याला निरोप दिला होता. त्यामुळे आज सकाळी लवकर तो जंगलात जाऊन जनावरे हिंडवून आणून मग शंकर अण्णांकडे कामाला जाणार होता.

 

लगबगीने त्याने घरात चहा घेतला आणि तसाच जनावरांच्या गोठ्यात आला. पांढऱ्या गायीचे दावे सोडून तिच्या गळ्यात बांधले. बाकीच्या जनावरांची दावी खुली केली. बरेच अंतर चालून गेल्यानंतर जंगलचा भाग होता. या भागात जंगली प्राण्यांचा वावर होता. परंतु आजपर्यंत जंगली प्राण्यांनी गुराख्यांना कधी धक्का लावला नव्हता.

 

तो जंगलाकडे आला. नेहमीच्या कुरणात जनावरे चरू लागली. काही वेळ गेल्यानंतर खिशातून आणलेल्या शेंगा त्याने फोडून खायला सुरुवात केली. शेंगदाणे खात असताना समोर पांढरी गाय बुजलेली त्याला दिसली. गाय काहीतरी हुंगत होती. ते पाहून तो पुढे आला आणि त्याला धक्काच बसला.

 

त्याने आजूबाजूला पाहिले. जवळपास कोणीच नव्हते. एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्याला दिसला होता. तसा तो घाबरला; पण वेळीच सावरून आपल्या जनावरांना हाकत त्याने तलावाकडील बाजूला वळवली. तलावामध्ये जनावरे पाणी पाजून तो जनावरांसह घराकडे आला. शंकर अण्णांकडे कामाला न जाता पळत जाऊन त्याने पोलिस पाटलांना याची खबर दिली

 

पोलिस पाटलांनी शहानिशा करून तातडीने जवळच्या पोलिस स्टेशनला खबर दिली. गडाचे नाव असणाऱ्या पोलिस स्टेशनमधील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एका तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडून होता. बरेच दिवस झाल्याने हा मृतदेह सडला होता. जागेवरच पंचनामा करून पोलिस काही धागेदोरे मिळतात का ते पाहू लागले. काही ओळखीची खून सापडत नव्हती. मात्र मृतदेहाच्या खिशात एक मोबाईल नंबर लिहिलेले चिठ्ठी सापडली होती.

 

पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिस मयत इसमाची ओळख पटते का हे पाहू लागले. गावात, जवळपासच्या वाडी वस्तीमध्ये असणाऱ्या लोकांकडे पोलिस चौकशी करू लागले. परंतु कोणत्याही ग्रामस्थांनी मृतदेहाची ओळख पटवली नाही. आता पोलिस खबऱ्यामार्फत मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू लागले.

 

पोलिसांनी मग त्या दहा आकडी नंबरवर लक्ष केंद्रित केले. तो नंबर एका मोबाईल दुकानाचा होता. पोलिसांनी दुकानात जाऊन चौकशी केली असता एक अनोळखी व्यक्ती मोबाईल दुरुस्त करण्यासाठी आला होता त्याने आपला नंबर लिहून नेला होता; पण कित्येक दिवस तो आपला मोबाईल परत नेण्यासाठी आलेला नव्हता. दुकानदाराने तो दुरुस्तीस दिलेला मोबाईल पोलिसांना दाखवला, तसेच मोबाईल दुरुस्तीला दिलेल्या व्यक्तीने दुकानदारच्या मोबाईलवरून त्याच्या एका मित्राला फोन केला होता. अशी माहिती दिली.

 

पोलिसांनी दुकानदारच्या मोबाईलवरून तो नंबर शोधून काढला. फोन केला. दुसऱ्या एका तरुणाने फोन उचलला.

 

‘साहेब बोला.’

 

‘हा नंबर कुणाचा आहे?’

 

पलीकडून आवाज आला. ‘साहेब मी चंदगड तालुक्यातून बोलतोय.”

 

पोलिसांना आश्चर्य वाटले. घटना घडलेले ठिकाण, फोन लागलेले ठिकाण यामध्ये जवळपास २०० कि.मी. चे अंतर होते. मग सविस्तर माहिती घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना काहीसे यश आले. मयत तरुण हा चंदगड तालुक्यातील होता, असा धागा पोलिसांना मिळाला होता.

 

पोलिसांनी तातडीने चंदगड गाठले. तेथे जाऊन मयत तरुणाच्या घरी चौकशी केली असता मयत तरुणाची फक्त आई त्या घरामध्ये राहात होती. अतिशय गरीब कुटुंब असून ‘पोट भरण्यासाठी आपला मुलगा कोल्हापूरला जातो असे म्हणाला’ एवढेच त्या आजीने सांगितले. शिवाय ‘आपण समीर शेळके नावाच्या व्यक्तीकडे कामासाठी जात आहे…’ एवढेच बोलण्याचे तिने सांगितले.

 

पोलिसांनी जिल्ह्याच्या ज्या भागात घटना घडली त्या भागात संबंधित व्यक्तीची चाचणी सुरू केली. यामध्ये पोलिसांना यश आले. समीर शेळके हा करवीर तालुक्यातील एका गावात राहत होता. मजूर पुरवणे हा त्याचा व्यवसाय होता. त्याने संबंधित तरुणाला सहा हजार रुपये घेऊन एका मेंढपाळाकडे बकरी राखण्याचे काम दिले होते; पण त्याचे त्यामध्ये मन रमत नसल्याने तो तिथून पळून आला होता. ज्याने पैसे दिले होते, त्याने पुन्हा शेळकेला गाठले. त्या दोघांनी मिळून त्या तरुणाला मारहाण केली व करवीर तालुक्यातील दुसऱ्या एका मेंढपाळाकडे बकरी राखण्यासाठी त्याला मजूर म्हणून ठेवले.

 

परंतु अगोदरच्या मारहाणी नेत्याची तब्येत बिघडली होती. त्यात काम करत नाही म्हणून त्या दोन नवीन मेंढपाळ मालक बंधूंनी त्याला पुन्हा मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ते दोघे गडबडले. आपल्या अंगावर बालंट नको म्हणून त्या दोघा भावांनी त्या मयत तरुणाचा मृतदेह एका घोड्यावर बांधला. वस्तीपासून लांब असे एका जंगलामध्ये टाकून दिला. त्या घनदाट जंगलामध्ये फारसा माणसांचा वावर नव्हता. आपला खून पचेल अशी त्यांची धारणा होती. परंतु रामू त्या दिवशी जनावरे चारण्यासाठी त्या भागात गेला आणि त्याला तो मृतदेह सापडला.

 

पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका तरुणाला मारहाणीमुळे आपला जीव गमवावा लागला होता. त्या दोघा बंधूंनी त्याला उपचार न करता पुन्हा निर्दयीपणे कामचुकारपणा केला म्हणून मारहाण केली होती. सध्या यातील सर्व आरोपी तुरुंगात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -