जांभळी (ता. शिरोळ) येथे चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या अपघातात (Shirol Accident) हरोली येथील डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. स्नेहल विजय उपाध्ये (वय ३०) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी, एक मे रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हरोली येथील डॉ. स्नेहल उपाध्ये या आपल्या मोपेडवरून जांभळीमार्गे दवाखान्यात जात होत्या.
चारचाकी वाहनचालक सूर्यकांत आण्णा कुरडे हा भरधाव वेगाने वाहन चालवत होता. जांभळी येथील तानाजी रणखांबे यांच्या घरासमोर आल्यानंतर चारचाकी वाहनाने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या मोपेडला धडक दिली. या धडकेत मोपेडवरील डॉ. स्नेहल उपाध्ये या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, चारचाकी वाहनचालक सूर्यकांत कुरडे हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी अभिजित कांतिनाथ ऐनापुरे (रा. हरोली, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे.