जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्च ऑपरेशन राबवून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. याचदरम्यान गुप्तचर यंत्रणेला अशी माहिती मिळाली होती की, या हल्ल्याशी संबंधित काही संशयित दहशतवादी चेन्नईवरून कोलंबोला पळण्याच्या तायरीमध्ये आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चेन्नईवरून कोलंबोकडे रवाना झालेल्या श्रीलंका एअरलाईन्सची फ्लाइट UL122 या विमानाची कोलंबोच्या बंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा दलाकडून तपासणी करण्यात आली.
गुप्तचर यंत्रणेला अशी माहिती मिळाली होती की, या हल्ल्याशी संबंधित काही संशयित दहशतवादी चेन्नईवरून कोलंबोला पळण्याच्या तायरीमध्ये आहेत. माहिती मिळाल्यानंतर लगेचच कोलंबोच्या बंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला अलर्ट करण्यात आलं होतं. विमान विमानतळावर पोहोचताच या विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
श्रीलंकेच्या पोलीस प्रवक्त्यानं याबाबत माहिती देताना सांगितलं की, आम्हाला अशी माहिती मिळाली होती की, चेन्नईवरून कोलंबोला येणाऱ्या विमानामध्ये पहलगाम हल्ल्याशी संबंधित काही संशयित दहशतवादी देखील आहेत. त्यानंतर आम्ही या विमानातील प्रवाशांची तपासणी केली. त्यानंतर या विमानाला पुढील उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आता मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानसोबत सुरू असलेली सर्व प्रकारची आयात निर्यात बंद करण्यात आली आहे, अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पाकिस्तानचा जळफळाट
दरम्यान भारतानं केलेल्या या कारवाईनंतर आता पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानच्या नेत्यांकडून विखारी वक्तव्य सुरू आहेत. युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आता त्याच्या मित्र राष्ट्रांची मदत घेण्याच्या तयारीमध्ये आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती पाकिस्तानने आपल्या मित्र राष्ट्रांना केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानवर प्रचंड दबाव वाढला आहे.