ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील फेणे गावात हृदयद्रावक घटना घडली असून पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फेणे गावात एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (वय ३२), मुलगी नंदिनी (वय १२), नेहा (वय ७ वर्ष) आणि अनु (वय ४ वर्ष) यांसोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेकवेळा दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत. घटनास्थळी आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असं लिहिलेली चिठ्ठी देखील मिळाली आहे. नक्की महिलेनं मुलींसह आत्महत्या का आणि कोणत्या कारणांमुळे केली? हे अजून स्पष्ट नसलं तरी पोलीस अनेक बाजूने या आत्महत्येचा तपास करण्यात गुंतले आहेत.
NEET परीक्षेआधीच विद्यार्थ्यानं आयुष्याचा दोर कापला
दरम्यान, लातूरमध्ये देखील एक आत्महत्येची घटना घडलीय. NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा होण्यापूर्वीच आपल्या आयुष्याचा दोर कापला आहे. लातूरमधील राहत्या खोलीतच त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थी गेले अनेक वर्ष कोचिंग क्लासमध्ये NEET परिक्षेची तयारी करत होता. मागच्या वेळी त्याला ५२० गुण मिळाले होते. मात्र तरीही त्याला वैद्यकीय प्रवेश मिळाला नव्हता. यंदाही तो NEET परिक्षेची तयारी करत होता. पण परिक्षेच्या १ दिवस आधीच त्याने राहत्या खोलीत आत्महत्या केली. तरूणाने आत्महत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.