पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अनेक कठोर पाउलं उचलली आहेत. भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद करण्यात आला आहे.पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान मंगळवारी मध्यरात्री भारतीय लष्करानं पाकिस्तावर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओकेमध्ये असलेले पाच दहशतवादी अड्डे आणि पाकिस्तानमध्ये असलेले चार दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानच्या या कृतीला देखील भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आज सकाळपासून पाकिस्तानच्या बारा शहरांवर पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या ड्रोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानची रडार सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता भारतानं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या कंटेटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानमधील सेलिब्रिटीजच्या सोशल मिडिया अकाऊंटवर भारतानं बंदी घातली होती. त्यानंतर आता सर्व प्रकारचं कंटेंट भारतात बॅन करण्यात आलं आहे.
सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून या संदर्भात ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि मिडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉम यांच्यासाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. भारतामध्ये पाकिस्तानमधून प्रसारीत होणारा कोणताही कंटेट दाखवून नका अशा सूचना मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता यूट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि इतर सोशल माध्यमांवर प्रसारीत होणारा पाकिस्तानी कंटेंट आता भारतात बॅन झाला आहे.
भारताचा ड्रोन हल्ला
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, भारताकडून पाकिस्तानच्या बारा शहरांवर ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे, या हल्ल्यामुळे पाकिस्तानात चांगलीच खळबळ उडाली आहे. भारताच्या या कारवाईचा धसका पाकिस्ताननं घेतला आहे.