येथील बंडगर माळ परिसरातील ज्ञानेश्वर गल्लीत झालेल्या घरफोडीचा अवघ्या १२ तासात छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये ऋषिकेश मल्लिकार्जुन सपली ( वय २५ रा. बंडगर मळा) या सराईत चोरट्यास अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख १ हजार ५०० रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, बंडगर माळ ज्ञानेश्वर गल्ली येथील ओंकार शिवानंद डांगरे यांचे घरात शिरून ५ मे रोजी चोरट्याने प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
याप्रकरणी ओंकार डांगरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला ऋषिकेश सपली हा चोरलेले दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सपली वाला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरलेले मंगळसूत्र रोख रक्कम मिळून आली. तर चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ऋषिकेश सपली याच्यावर यापूर्वीही चोरीचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण साने, पोलीस अंमलदार सुकुमार बरगाले, अरविंद माने, सुनील बाईत, पवन गुरव, सतीश कुंभार, विजय माळवदे, मोहसीन पठाण व अविनाश भोसले यांच्या पथकाने केली.