मुंबईतील केईएम रुग्णालयातून पुन्हा एकदा कोरोनाच्या धोक्याची चाहूल लागण्यासारखी गंभीर माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, यामुळे मुंबईकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
केईएम रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेली ५८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह होती, मात्र ती इतर गंभीर आजारांनी देखील त्रस्त होती.
दुसरीकडे, १३ वर्षीय मुलीचा मृत्यू मूत्रपिंडाच्या आजारामुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तिचाही कोविड अहवाल पॉझिटिव्ह होता. यावरून असे दिसून येते की, दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असले तरी त्यांचा मृत्यू थेट कोरोना संसर्गामुळे झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
या घटनेवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत, दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा दावा केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आणि रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यांनी स्पष्ट केलं की, कोविड हा या रुग्णांच्या आजारांपैकी एक घटक होता, मात्र एकमेव कारण नव्हतं.
या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांना सतर्क राहण्याची गरज अधोरेखित होते. जरी कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव सध्या दिसत नसला, तरी अशा घटनांमुळे संभाव्य लाटेचा धोका नाकारता येत नाही. विशेषतः जेष्ठ नागरिक, लहान मुलं आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे.