कर्ज देण्याच्या बहाणा करून लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या टोळीने तारदाळ येथील व्यावसायिकाकडे कोटींची खंडणी मागितली.
याप्रकरणी स्नेहा संजय नारकर (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) हिच्यासह शांताबाई बाळकुंडे (रा. यशवंतनगर इचलकरंजी), संतोष पाटील (रा. चिपरी, ता. शिरोळ), शेखर गाडेकर (रा. जयसिंगपूर) आणि रामचंद्र (नारकर हिच्या कारवरील चालक) या पाच जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा (वय ४७, रा. संगमनगर, तारदाळ) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्दा यांची तारदाळ येथे सायझिंगचा व्यवसाय आहे. स्नेहा नारकर हिने प्रवासात ओळख बाढवून आपण कोल्हापुरातील एका बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर काम करीत असल्याचे सांगितले. व्यवसायासाठी कर्ज मिळवून + देण्यासह बँकांकडे तारण असलेले सोने लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिने संपर्क वाढवला. त्यानंतर काही दिवसांत तिने मर्दा यांच्याकडे कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून त्रास देण्याची धमकी तिने दिली. दरम्यान, नारकर हिला दुसऱ्या गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून, तिचा ताबा घेतला जाईल तसेच इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.