पुणे महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांचे सर्व दावे फोल ठरत आहे. काही मिनिटांच्या पावसात पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप येत आहे. पुणे येथील प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी आयटीपार्कची पावसामुळे पूर्ण वाताहात झाली आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भागात साचलेल्या कंबरे इतक्या पाण्यातून पीएमपी चालकाने बस काढण्याचे धाडस केले आहे. त्याच्या या धाडसामुळे दुर्घटना होण्याचा धोका होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुणे येथील आयटी पार्क परिसरात धो धो पाऊस झाला. हिंजवडी आयटी पार्कमध्ये शनिवारी दहा मिनिटांच्या पावसाने हाहाकार झाला. यामुळे या भागातील रस्त्यांना वाहत्या नदीचे स्वरूप आले होते. हिंजवडी परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यावर अक्षरशः तळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पाण्यातून एक पीएमपी बसचालक धोकादायक पध्दतीने बस घेऊन जात असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
वारंवार पाणी साचण्याचे प्रकार
हिंजवडीमधील मुख्य रस्त्यांवर वारंवार मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. परंतु महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्यावर काहीच उपाययोजना केल्या जात नाही. या भागातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्यामुळे काही मिनिटांच्या पावसात रस्त्यांचे रुपांतर नदीत होत आहे. यामुळे परिसरातील वाहतूक काहीकाळ ठप्प होऊन, वाहनांच्या लांब रांगा लागत असतात. हिंडवडी फेज तीन आणि दोन परिसरात डोंगरउतार आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत.
धरणांमधील जलसाठा वाढला
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणे भरायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढली होती. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव धरण मिळून १८.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला १४.५७ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी ४ टक्के जास्त पाणीसाठा आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा
खडकवासला: 41.01 टक्के
पानशेत: 15.67 टक्के
टेमघर: 4.80 टक्के
वरसगाव: 21.80 टक्के
चार धरणातील एकूण पाणीसाठा: 18.70 टक्के
पुण्यात आजही पावसाची शक्यता
पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी रविवारी येलो अलर्ट दिला आहे. पुण्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे