आषाढी कार्तिकी भक्तगण येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती.. या ओळी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. मोठ्या आनंदाने- उत्साहाने, विठुरायाच्या नामाचा जप करत वारकऱ्यांची पाऊले पंढरीच्या दिशेने जात आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी अलोट सागर जमला आहे. भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर समितीवर राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन जारी करत नवा आदेश काढला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी रांगेत हजारो भाविक असताना व्हीआयपी दर्शन दिल्यास कारवाई होणार असल्याचे या आदेशात स्पष्टपणे म्हंटल आहे.
काय आहे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन? Pandharpur VIP Darshan
आषाढी शुध्द एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. यावर्षी सन २०२५ मध्ये रविवार दिनांक ०६ जुलै, २०२५ रोजी आषाढी एकादशी संपन्न होत आहे. श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे. त्यामुळे दर्शनरांगेतील भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तथापि, व्हिआयपी दर्शनाबाबत (Pandharpur VIP Darshan) विविध समाज माध्यमांत बातम्या प्रसिध्द होत आहेत. नियमित प्रवेशद्वारातून न सोडता इतर प्रवेशद्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारी देखील प्रसारमाध्यमांद्वारे प्राप्त होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना समानतेने व शांततेने दर्शन देणे आवश्यक आहे व कोणत्याही अन्य मार्गाने दर्शन न देता, रांगेचे सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
शासनाने उत्सवाच्या दिवशी व इतर महत्वाच्या दिवशी कोणत्याही मंदिरामध्ये भाविकांना दर्शन देण्याबाबत शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१०/३५/(प्र.क्र.८५)/का.सोळा दि. ०७/०९/२०१० अन्वये मार्गदर्शक सुचना केलेल्या आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत व काटेकोरपणे पालन करून दर्शनरांगेचे सुयोग्य नियोजन करून सर्वसामान्य भाविकांना शांततेने दर्शन देण्याची व्यवस्था करावी. उपरोक्त शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला आहे. त्यामुळे VIP दर्शन (Pandharpur VIP Darshan) घेणार्यांना दणका बसणार आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुर गजबजले आहे. आषाढीआधीच काही भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र टाळ मृदूंग आणि विठुरायाच्या नामाचा जयघोष ऐकायला मिळतोय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे जात आहे. जिल्हा प्रशासनाने सुद्धा वारीच्या निमित्ताने जोरदार तयारी केली आहे.