वर्गशिक्षक रागावल्याच्या कारणाने दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विवेक राऊत असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेकने सुसाईड नोट लिहून शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
विवेक हा बुलढाण्यातली वसाडी येथील जय बजरंग विद्यालयात शिकत होता. तो यंदा दहावीच्या वर्गात होता. काल शाळेत एका शिक्षकाने विवेकला काही प्रश्न विचारले. मात्र त्याला त्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. त्यामुळे शिक्षक त्याच्यावर रागवले. मी तुझ्या आई-वडिलांना तू अभ्यास करत नाहीस हे सांगेन, असे त्या शिक्षकाने रागात म्हटले होते. मात्र हाच राग डोक्यात ठेवून विवेकने मधल्या सुट्टीत गावाजवळीलच शेतात जाऊन गळफास घेतला.
आत्महत्या करण्यापूर्वी विवेकने एक सुसाईड नोट लिहिली होती “सूर्यवंशी या वर्ग शिक्षकाने मला रागवले, आई-वडिलांवरून बोलले, त्यामुळे मी फाशी घेत आहे!” असे त्याने स्पष्टपणे म्हटले आहे. या घटनेनतंर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद
शाळा सुरु होऊ एक महिनाही उलटलेला नाही. पण असे असताना घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.