वसंतनगरातील टिपू सुलतान चौकालगत राहत्या घरी पतीने पत्नीचा कोंबडी कापण्याच्या सुरीने गळा चिरून खून केला. पत्नीला ठार मारणाèया पतीने पोलिस ठाण्यात जाऊन समर्पण केले.
ही दुर्दैवी घटना मंगळवार, 8 जून रोजी रात्री 3 च्या दरम्यान घडली. सानिया मोहम्मद आसिफ कुरेशी (वय 22) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तर आसिफ शफी कुरेशी (वय 28) असे खून करणाèया पतीचे नाव आहे.
आसिफ व सानिया यांचा दोन वर्षांपूर्वी रितीरिवाजाने विवाह झाला होता. आसिफ कोंबड्या कापून त्या विकून उदरनिर्वाह करीत होता. विवाहानंतर त्यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच वाद होत असे. सततच्या भांडणाला कंटाळून सानिया माहेरी गेली होती. अशातच दोन-तीन दिवसांपूर्वीच समाजातील काही लोकांनी तिची समजूत काढून पतीकडे परत आणले होते.
घटनेच्या काही तासांपूर्वी या पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आसिफने कोंबडीप्रमाणे तीच सुरी पत्नीच्या गळ्यावर चालवून तिचा जीव घेतला. त्यानंतर तो स्वतःहून ठाण्यात हजर झाला. सानियाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच तिच्या माहेरच्यांनी पुसद गाठले. मृत्यू झालेल्या सानियाचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आला होता. वृत्त लिहेस्तोवर वसंतनगर पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दिलेली नव्हती.