Wednesday, July 23, 2025
Homeकोल्हापूर'प्राडा'ने जाणून घेतले कोल्हापुरी चपलेच्या निर्मितीचे पैलू

‘प्राडा’ने जाणून घेतले कोल्हापुरी चपलेच्या निर्मितीचे पैलू

सुमारे सातशे वर्षांची परंपरा असलेली कोल्हापुरी चप्पल कशी बांधली जाते? चामडे कमावण्याची प्रक्रिया काय आहे? टिकाऊपणासाठी कोणते कसब वापरले जाते? पारंपरिक डिझाईनचा बाज कसा ठेवला जातो?

 

किती टप्प्यात चप्पल बनवली जाते? हे प्रश्न होते ‘प्राडा’ या आंतरराष्ट्रीय फॅशन ब-ँडच्या शिष्टमंडळातील तंत्रज्ञांचे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला परिपूर्ण उत्तर देत कारागिरांनी कोल्हापुरी चप्पलच्या निर्मितीचे पैलू ‘प्राडा’ कंपनीच्या सदस्यांसमोर उलगडले.

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या पुढाकाराने ‘प्राडा’चे शिष्टमंडळ आणि कारागीर यांच्यात सकारात्मक संवाद झाला. या भेटीने लवकरच कोल्हापुरी चप्पलचा जागतिक बाजारपेठेतील नव्या नांदीचा मार्ग सुकर होण्याचे संकेत दिले. महाराष्ट्र दौर्‍यांतर्गत इटालियन कंपनी ‘प्राडा’चे सहा सदस्यीय शिष्टमंडळ मंगळवारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनगर, जवाहरनगर, कंदलगाव, कागल येथील चप्पलनिर्मिती करणार्‍या कारागिरांशी सविस्तर संवाद झाला. ‘प्राडा’चे पाओलो टिव्हरॉन, डॅनियल कोंटू, आंद्रिया पोलास्ट्रेली, रॉबर्टो पोलास्ट्रेली या सदस्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

 

कोल्हापुरी चप्पल आणि ‘प्राडा’ वाद निवळला

 

इटली येथील ‘प्राडा’ या कंपनीच्या उन्हाळी फॅशन महोत्सवात कोल्हापुरी चपलेचा वापर केला होता. कोल्हापूरच्या नावाचा कोणताही उल्लेख न करता कंपनीने हे उत्पादन त्यांचेच असल्याचा दावा केला होता. यावर तीव- प्रतिक्रिया उमटल्या. अनेक तक्रारींनंतर कंपनीने भारतीय कलाकुसरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून कारागिरांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली. ‘प्राडा’चे संचालक लोरेंझो बर्टेली यांनी याबाबत एक पत्र ललित गांधी यांना पाठवले होते. ‘प्राडा’ने सुरू केलेला संवाद महत्त्वपूर्ण टप्प्यावर आला आहे.

 

महिला कारागिरांचे कौतुक

 

‘प्राडा’सारख्या जागतिक फॅशन ब-ँड असलेल्या कंपनीच्या सदस्यांना कोल्हापुरी चप्पलची परंपरा, बांधणी, निर्मिती, पारंपरिक बाज याविषयी माहिती देताना कारागीरही सुखावले. वेगळी धाटणी असूनही कोल्हापुरीला अपेक्षित मूल्य मिळत नसल्याचे कारागिरांनी अधोरेखित केले. कागल येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोल्हापुरी चप्पलनिर्मिती केंद्रातील महिला कारागिरांच्या सहभागाचे ‘प्राडा’च्या सदस्यांनी कौतुक केले.

 

आज चप्पललाईन येथील व्यापार्‍यांशी संवाद

 

बुधवारी सकाळी 9 वाजता चप्पललाईन येथील व्यापार्‍यांची ‘प्राडा’चे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. जागतिक बाजारपेठेत चप्पलच्या मार्केटिंगविषयी या भेटीत चर्चा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -