पुण्याहून परभणीला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये 19 वर्षीय तरुणीनं नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीच्या बाहेर फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. महिला नुकतीच प्रसूत झाली होती.
.पुण्याहून परभणीला येणाऱ्या परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. बाळाचं पालनपोषण न करण्याच्या उद्देशातून नवजात बाळाला काळसर कपड्यात गुंडाळून चालत्या ट्रॅव्हल्समधून फेकून विल्हेवाट लावल्याप्रकरणी गंभीर गुन्ह्यांची नोंद केलीय. ऋतिका ढेरे आणि अल्ताफ शेख असे दोन्ही आरोपींची नावं आहेत. (Parbhani Crime News)
नेमका प्रकार काय?
ऋतिका ढेरे (वय १९) आणि तिचा साथीदार अल्ताफ मेहनुद्दीन शेख हे दोघं मागील काही महिन्यांपासून पुण्यात एकत्र राहत होते. त्यांनी लग्न केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आज पहाटे ‘संत प्रयाग ट्रॅव्हल्स’ ने हे दोघं पुण्याहून परभणीकडे निघाले होते. पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवाराजवळ गाडी आली असता ऋतिकाची अचानक प्रसूती झाली. प्रसूतीनंतर त्या तरुणीनं नवजात अर्भकाला काळसर आणि निळसर कपड्यांमध्ये गुंडाळून, थेट चालत्या गाडीमधून रस्त्यावर फेकून दिलं. या अमानुष कृत्याचा प्रत्यक्षदर्शी झालेल्या एका नागरिकानं तत्काळ पाथरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. बाळ जिवंत आहे की नाही याबाबत अद्याप माहिती नाही.
पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप, दोघांना ताब्यात
माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अमोल जयस्वाल यांच्या पथकानं तत्काळ ट्रॅव्हल्सचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतून संबंधित तरुणी व तिचा साथीदार अल्ताफ शेख यांना ताब्यात घेण्यात आलं. ऋतिका ढेरे हिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ९४(३)(५) अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात अर्भकाला मुद्दाम विल्हेवाट लावण्याच्या उद्देशानं हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन चौकशी सुरू केली आहे.
या संतापजनक घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अर्भकाबाबत न्यायवैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे. समाजात जागरूकता आणि कठोर कायद्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.