मँचेस्टर कसोटीला सुरूवात होताच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली. सामन्याच्या पहिल्या डावाताच भारताचा नामवंत क्रिकेटपटून ऋषभ पंतला मोठी दुखापत झाली. त्यामुळे आता पुढे काय होणार ? ऋषभ पंतची दुखापत कितपत मोठी आहे ? तो मँचेस्टर कसोटीत पुनरागमन करू शकेल की त्याला सीरीजमधूनच बाहेर पडावं लागेल ? असे एक ना अनेक असा सवाल सध्या प्रत्येक क्रिकेट फॅनच्या मनात घोळत आहेत. या सर्व प्रश्नांवर अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. परंतु या प्रकरणात दोन अपडेट्स निश्चितच आले आहेत. ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल पहिले अपडेट साई सुदर्शन यांनी दिले आहे. तर दुसरे विधान भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी केले आहे.
ऋषभ पंतच्या दुखापतीवर साई सुदर्शन यांचं अपडेट
ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल साई सुदर्शनने जे म्हटले आहे त्यानुसार, दुखापतीनंतर त्याला खूप वेदना होत होत्या. त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले.मँचेस्टरमधील पहिल्या दिवसाच्या खेळानंतर साई सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतच्या दुखापतीची माहिती लवकरच उपलब्ध होईल.
भारताचा डावखुरा फलंदाज सुदर्शनच्या मते, जर ऋषभ पंत मँचेस्टर कसोटी किंवा या मालिकेत पुढे खेळला नाही तर तो भारतीय संघासाठी मोठा धक्का असेल. मात्र, इतर फलंदाज पंतचे अपूर्ण काम करण्यास तयार आहेत, असेही त्याने सांगितलं.
ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल संजय बांगर काय म्हणाले ?
ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनीदेखील एक विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, पंतच्या उजव्या पायाच्या लहान बोटाजवळ दुखापत झाली आहे. पायाचा तो भाग नाजूक आहे. अशा परिस्थितीत त्याला हेअरलाइन फ्रॅक्चर होऊ शकते. पण असं काही झालं नसावं अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जर फ्रॅक्चर झालं नसेल तर ऋषभ पंत बॅटिंग करण्यास नक्कीच उतरेल, असे ते म्हणाले. पण कदाचित तो वीकेट कीपिंग करू शकणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरैल पुन्हा ग्लोव्ह्ज घालून क्षेत्ररक्षण करताना दिसू शकतो.
ऋषभ पंतला कशी झाली दुखापत ?
मँचेस्टर कसोटीत 48 चेंडूत 37 धावा फटकावणारा ऋषभ पंत खेळत असतानाच त्याला दुखापत झाली. ख्रिस वोक्सच्या यॉर्कर लेन्थ बॉलवर रिव्हर्स स्वीप खेळताना पंतला दुखापत झाली. दुखापतीमुळे त्याच्या उजव्या पायाच्या करंगळीला दुखापत झाली, ज्यातून रक्तस्त्रावही झाल्याचे दिसून आलं. हळू-हळू त्या जागी सूज वाढली आणि ऋषभ पंत वेदनेने व्हिवळू लागला. पंतच्या दुखापतीची गंभीरता लक्षात घेता, त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले, ज्याबद्दल बीसीसीआयकडून नंतर अपडेट देखील देण्यात आले.