आयपीएल 2025 स्पर्धेत केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला. त्याला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने नकार दिल्याने अक्षर पटेलकडे सूत्र सोपवण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सने मागच्या पर्वात चांगली सुरुवात केली मात्र त्यानंतर गाडी रुळावरून घसरली. बाद फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आलं. या स्पर्धेत केएल राहुल 13 सामन्यात खेळला आणि 539 धावा केल्या होत्या. आताही केएल राहुल फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. असं असताना आयपीएल फ्रेंचायझीमध्ये ट्रेड विंडोची दारं खुली झाली आहे. मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करता येणार आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने केएल राहुलसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. केएल राहुलसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सची चर्चा केल्याचं वृत्त आहे. जर दिल्ली कॅपिटल्सने ऑफर स्वीकारली तर तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसू शकतो.
कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी पुढील पर्वासाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. गेल्या हंगामात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. त्यामुळे आगामी आयपीएल लिलावापूर्वी संघातील काही खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केएल राहुलला संघात घेण्यासाठी रस दाखवल्याची चर्चा आहे.केकेआर फ्रँचायझी केएल राहुलची निवड करून एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न करणार आहे.
पहिलं, कोलकाता नाईट रायडर्सला एका चांगल्या कर्णधाराची गरज आहे. दुसरं, केएल राहुल हा सलामीला फलंदाजी करतो. तिसरं, केएल राहुल विकेटकीपर आहे. केएल राहुलला ट्रेडिंग केल्याने एकाच पर्यायाने तीन समस्या सोडवता येतील. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीसोबत चर्चा करत आहे. फ्रेंचायझी केएल राहुलसाठी 25 कोटी मोजण्यास तयार असल्याची वावड्याही उठल्या आहे. केएल राहुलसाठी दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटींची रक्कम मोजली होती. त्यामुळे त्याच्या पुढेच आकडा असेल यात काही शंका नाही. आयपीएल 2026 मिनी लिलावापूर्वी कोलकाता संघात सहभागी झाला तर आश्चर्य वाटायला नको.