रोग म्हशीला आणि औषध पखालीला ही ग्रामीण भागात प्रसिद्ध म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नांदेड जिल्ह्याततील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावाला आला आहे. या गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्याने म्हैस दगावल्याची घटना घडली. मात्र, म्हशीचा मृत्यू होण्यापूर्वी तिचं दूध गावात अनेक ठिकाणी वितरित झाले होते. तसेच चहा अन्य पदार्थांत दुधाचा वापर झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळं गावातील 182 जणांना रेबीजची लस देण्यात आली आहे.
182 लोकांना दिली रेबीज प्रतिबंधक लस
मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात किशन दशरथ इंगळे यांच्या म्हशीला कुत्र्याने बऱ्याच दिवसापूर्वी चावा घेतला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हैस अचानक आजारी पडली. कुत्रा चावल्याची लक्षणे उशीरा समजल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने 5 ऑगस्ट रोजी म्हैस दगावली. मृत्यूपूर्वी तिचं दूध गावात अनेक ठिकाणी वितरित झाले होते. तसेच चहा अन्य पदार्थांत वापर झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकूण 180 लोकांनी दुध प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी 182 लोकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली होती.
रेबीजच्या भीतीपोटी नागरिकांनी घेतली लस
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, येवती 98 राजुरा 25 बाराळी 19 देगलूर 10 बिल्लाळी 30 असे एकूण 182 लोकांना रेबीजची लस देण्यात आली आहे. गावात आरोग्य विभागाचे पथक तळ ठोकून आहे. म्हशीला रेबीज झाला असेल म्हणून आम्हाला होईल ही भीती लोकांना होती. त्यामुळं त्यांनी लस घेतल्याचे डॉ प्रणिता गव्हाणे यांनी सांगितले.
रेबीज हा अत्यंत घातक आजार
दरवर्षी भारतात लाख लोकांना कुत्रा किंवा इतर प्राणी चावतात. या आजारावर अत्यंत प्रभावी लस उपलब्ध असूनही दरवर्षी सुमारे 20 हजाराहून अधिक भारतीय रेबीज (जलतृषा) या आजाराला बळी पडतात. कारण रेबीज हा अत्यंत घातक आजार आहे. कुत्र्याशिवाय लांडगा, कोल्हा, मुंगुस, वटवाघूळ किंवा इतर पाळीव प्राण्यांमुळे देखील हा आजार होऊ शकतो. हे खरे असले तरी भारतातील जवळपास 96 टक्के रेबीज केसेस या श्वानदंशामुळे होतात, ही वस्तुस्थिती आहे. जगाच्या एक तृतियांश हून अधिक रेबीज रुग्ण भारतात आढळतात. श्वान दंशावरील लशीची मोफत आणि सर्वदूर उपलब्धता. महाराष्ट्रात ही लस सर्वात जास्त वापरण्यात येते.