पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते सध्या महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश करत असल्याचं पहायला मिळत आहे.
आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या घरी भेट देणार आहेत. रवींद्र चव्हाण हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांच्या घरी भेट देणार आहेत, या भेटीची आता जोरदार चर्चा सुरू आहे, या भेटीदरम्यान भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये डिनर डिप्लोमसी पाहायला मिळणार आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. रवीद्र चव्हाण हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रवीद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील आज जेवणासाठी पृथ्वीराज पाटील यांच्या घरी जाणार आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपाचे प्रमुख नेते आज पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट देणार असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनंतर आता जिल्हाध्यक्ष देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला तर हा काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालच पुण्यात बोलताना भाजपात आणखी काही पक्ष प्रवेश होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता पृथ्वीराज पाटील हे भाजपात प्रवेश करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. दरम्यान आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.