कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर सतत वाढत आहे. या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 आणि 6 सकाळी लवकर उघडला आहे.
दरवाजा क्रमांक 3 रात्री 2 वाजून 16 मिनिटांनी, तर दरवाजा क्रमांक 6 पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी उघडला. या दोन दरवाजांतून मिळून 2856 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, पायथा विद्युत गृहातून 1500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
अशा प्रकारे एकूण 4356 क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात अनावश्यक हालचाली टाळण्याचे आवाहन केले आहे.
या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.