राज्यात पावसाचा जोर वाढला आहे, गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पुराचा धोका वाढला आहे. राज्यातील काही गावांना तर तळ्याचं स्वरुप आलं आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची चांलगीच गैरसोय होत आहे.
दरम्यान आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाकडून राज्यात 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.
या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. वीज चमकणे, गडगडाट, तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.
मच्छीमारांसाठी इशारा
कोकण किनारपट्टी भागात पुढील पाच दिवस ताशी 50 ते 60 किमी एवढा वाऱ्याचा वेग राहणार आहे. त्यामुळे या काळात समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ॲपमार्फत अलर्ट संदेश
सध्या राज्यात अतिवृष्टीची शक्यता असल्यानं सचेत ॲपमार्फत नागरिकांना वेळोवेळी बदललेल्या हवामानाबाबत अलर्ट पाठवले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी तसेच कुंडलीका नदी व रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून, याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत, खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र 24×7 सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल – ९३२१५८७१४३ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहेत.
मुंबई उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात
दरम्यान मुंबई उपनगरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या एक तासांपासून कुर्ला , घाटकोपर , सायन , मुलुंड , ठाणे इथे मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
अमरावतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस
तिवसा तालुक्यातील शिरजगाव, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधुर, मोझरी सह तालुक्यातील अनेक गावाला पावसाने झोडपलं आहे. नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, त्यांचं प्रंचड नुकसान झालं आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शेकडो हेक्टरवर असलेल्या संत्रा पिकांना पावसाचा फटका बसला आहे.
मुर्तीजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मूर्तिजापूर ते दर्यापूर रोडवर असलेल्या लाखपुरी गावाजवळील वनमाला पुलावर एक ते दीड फूट पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा मार्ग बंद झाल्याने वाहानांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. शेतामध्ये फक्त पाणीच पाणी दिसत आहे.