मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. एकीकडे धो धो पाऊस कोसळत असताना दुसरीकडे दहीहंडी पथकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे दहीहंडी मोठ्या जल्लोषात सुरु असताना दुसरीकडे या उत्सवाला गालबोट लागले आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात दोन तरुण गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २५० पेक्षा जास्त गोविंदा हे जखमी झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये झालेल्या अपघातांमुळे दहीहंडी उत्सवाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच गोविंदा पथकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मुंबई, ठाण्यात शेकडो गोविंदा जखमी
या उत्सवादरम्यान मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील २५० हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. यात मुंबईतील २१० गोविंदा जखमी झाले आहेत. तर ठाणे, कल्याण डोंबिवलीत 30 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. रात्री १० वाजेपर्यंत मुंबईतील विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांमध्ये ९५ गोविंदांना उपचारासाठी आणण्यात आले होते. यापैकी ७६ जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला, तर १९ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ९ वर्षांच्या आर्यन यादव आणि २३ वर्षांच्या श्रेयस चाळके या दोन गोविंदांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ठाणे शहरात दहीहंडीचा थरार सुरु असताना २२ गोविंदा जखमी झाले. तर कल्याण-डोंबिवलीत ८ गोविंदांना दुखापत झाली. या जखमींमध्ये अवघ्या ५ वर्षांच्या एका चिमुकल्याचा समावेश आहे. हा मुंबईच्या भांडुपमध्ये राहणारा असून त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. ठाण्यातील १८ वर्षांच्या एका गोविंदाला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवलीत 8 गोविंदा जखमी
कल्याण-डोंबिवलीमध्ये दहीहंडीचा थरार सुरू असताना 8 गोविंदा जखमी झाले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारानंतर लगेचच सोडून देण्यात आले. बिर्ला कॉलेज परिसरात मनोरा उभारताना पाचव्या थरावरून पडल्याने एका नववीत शिकणाऱ्या मुलाला किरकोळ दुखापत झाली. तसेच, पालिका मुख्यालयासमोर मनोरा उभारताना २३ वर्षांचा एक गोविंदा जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर डोंबिवली पश्चिमेकडील मनोरा उभारताना दोन गोविंदा किरकोळ जखमी झाले.
सुरक्षा नियमांचे उल्लंघन
यंदा अनेक ठिकाणी दहीहंडीसाठी लाखोंच्या घरात बक्षिसांची रक्कम जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये थरांसाठी तीव्र स्पर्धा दिसून आली. मात्र, या स्पर्धेच्या नादात अनेक ठिकाणी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. उंच थर रचताना हेल्मेट किंवा इतर सुरक्षा साधनांचा वापर न केल्यामुळे अनेक गोविंदांना गंभीर दुखापती झाल्या. दहीहंडी हा एक साहसी खेळ असला, तरी जीव धोक्यात घालून तो साजरा करणे योग्य नाही, हे या घटनांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.