पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रविवारचा मुहूर्त साधत 17 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान-यूएई विरूद्धच्या ट्राय सीरिज आणि आशिया कप 2025 स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. त्यानंतर सलमान अली आगाह या दोन्ही स्पर्धेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर पीसीबी निवड समितीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी जोडीला डच्चू दिला. संघ जाहीर झाल्यानंतर आता पाकिस्तान सज्ज झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा कायम आहे. बीसीसीआय निवड समिती आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा करणार? या प्रतिक्षेत चाहते आहेत.
यूएईंचं तिकीट कुणाला मिळणार?
यंदा आशिया कप 2025 स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि ओमान ए ग्रुपमध्ये आहेत. त्यात आता पाकिस्तानने संघ जाहीर केल्याने भारतीय चाहत्यांची उत्सूकता वाढली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. बीसीसीआय निवड समिती प्रमुख अजित आगरकर भारतीय संघाची घोषणा करणार आहेत. कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाही? हे निवड समिती आणि कर्णधार ठरवणार आहे. मात्र काही खेळाडूंना या स्पर्धेसाठी डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
निवड समितीसमोर असंख्य आव्हानं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन गिल याने आशिया कप स्पर्धेसाठी उपलब्ध असणार, असं बीसीसीआयला कळवलं आहे. त्यामुळे शुबमनचा उपकर्णधार म्हणून समावेश केल्यास नियमित व्हाईस कॅप्टन असणार्या अक्षर पटेलचं काय? अक्षरचं डिमोशन केलं जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
तसेच शुबमन, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल या तिघांसाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्यांपैकी कुणाला डच्चू द्याचा? हा मोठा प्रश्नही निवड समितीसमोर आहे. त्यामुळे निवड समिती काय निर्णय घेते आणि कोणत्या खेळाडूंना यूएईला जाण्याची संधी देते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा आणि जितेश शर्मा-ध्रुव जुरेल.