कोकणातील वाहतूक आंबोलीमार्गे
आंबोली वगळता कोल्हापूरचा कोकणशी संपर्क तुटलाकोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आज सकाळी ८ वाजता ३९.०७ इतकी झाली. यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. सोमवारी पात्राबाहेर पडलेले पंचगंगेच्या पुराचे पाणी आज गायकवाड पुतळ्यापर्यंत आले होते. त्यामुळे शिवाजी पूल ते गंगावेश मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ४१ मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सरासरी ६५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दुसरीकडे राधानगरी धरणाच्या सात पैकी आज पहाटे ५ स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. तर धरण क्षेत्रात काहीअंशी पाऊस कमी झाल्याने पाणी पातळी आज दिवसभर स्थिर राहण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट, तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास लवकरच धोका पातळीकडे वाटचाल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पाणी येणाऱ्या भागातील लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास स्थलांतराचीही तयारी करण्यात आली आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील ६८ घरांच्या भिंतींची पडझड होऊन ३२ लाख सात हजारांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत दोन कोटी ४८ लाखांचे नुकसान झाले आहे. नद्या, नाल्यांमधील पाणी वाढल्याने जिल्ह्यातील आठ राज्य मार्ग, २२ प्रमुख जिल्हा मार्ग, १० ग्रामीण मार्ग व एक इतर जिल्हा मार्ग बंद झाला आहे. येथील वाहतूक आसपासच्या पर्यायी मार्गांवरून सुरू आहे.
जिल्ह्यात आज व उद्या, मंगळवारी कुलाबा, मुंबई येथील भारतीय हवामान शास्त्र विभाग व प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्रातर्फे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो. अंदाजानुसार जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही त्यानुसार सतर्क आहे.
पुराच्या पाण्यातून निघालेल्या स्कूलबसला नागरिकांनी रोखले
पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. नदी घाट परिसरातील संजयसिंह गायकवाड पुतळ्यासमोरील रस्त्यावर पाणी आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यातच आज सायंकाळी एक स्कूल बस थेट शिवाजी पुलाकडे जाताना गायकवाड पुलाजवळील पाण्यात गेली; परंतु नागरिकांनी ओरडून चालकाला गाडी थांबविण्यास सांगितल्याने त्याने जागेवर बस थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. नंतर ही गाडी मागे वळवून पर्यायी मार्गाने गेली.
पाऊस असा
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सकाळी दहापर्यंत सरासरी ६५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकावार पाऊस मिलिमीटरमध्ये असा – गगनबावडा १५१.३, हातकणंगले- ५०.८, शिरोळ -३४.४, पन्हाळा- ७०.९, शाहूवाडी- ७७, राधानगरी- ९१.८, करवीर- ५९.९, कागल- ७२, गडहिंग्लज- ५१.९, भुदरगड- ९२.२, आजरा- ६६.९, चंदगड- ६५.४.