गेल्या आठवडाभर धो धो कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. राज्यभर सर्वत्रच पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला आणि उजनी ही प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचा थेट परिणाम कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गाणगापूरला बसला असून या ठिकाणी असलेल्या भीमा नदीला पूर आला आहे.
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे गाणगापूर-विजयपूर राज्यमार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबली आहे. या पुराचा फटका महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांतील भीमा नदीकाठच्या शेतीला बसला आहे. आता ऊस आणि केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भीमा-अमरजा संगम परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाटक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाशिकमध्ये जनजीवन पूर्वपदावर
नाशिक शहर आणि जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन सामान्य झाले आहे. गेल्या आठवड्यात गोदावरी नदीला आलेला पूरही पूर्णपणे ओसरला आहे. पूर ओसरल्यानंतर रामकुंड परिसरात पूजाविधी आणि पर्यटकांसाठी गर्दी वाढली आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. यामुळे गोदाकाठची परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आली आहे.
सांगलीत मगरीचे दर्शन, शेतकऱ्यांचे नुकसान
सांगली जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर अनेक जलचर प्राणी नदीपात्राबाहेर पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या आमनापूरमध्ये एक मगर आढळून आली होती. तर आज कर्नाळ रोडवरील डिग्रज मार्गावर शेतात एक मोठी मगर आढळून आली. ही अजस्त्र मगर पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी सतर्कता बाळगत तिला पुन्हा नदीपात्रात सोडले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शेतकरी आर्थिक संकटात
याचबरोबर, भीमा नदीच्या पुरामुळे पंढरपूर तालुक्यातील शेळवेवाडी, कुरोली आणि पिराची कुरोली भागातील ऊस आणि केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पुराचे पाणी शेतात घुसल्याने ऊस पूर्णपणे खराब झाला आहे. तर अनेक ठिकाणी केळीच्या बागा वाहून गेल्या आहेत. आमदार अभिजीत पाटील यांनी तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.