आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या आठही संघांनी कंबर कसली आहे. जेतेपदासाठी भारतीय संघ दावेदार मानला जात आहे. असं असताना अफगाणिस्तानने आपल्या संघात या स्पर्धेपूर्वी मोठा बदल केला आहे. अफगाणिस्तानने नव्या फील्डिंग कोचची घोषणा केली आहे. तसेच नवा फिजियोथेरेपिस्टही नियुक्त केला आहे. आशिया कप स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तान संघ ट्रायसिरिज खेळणार आहे. त्यासाठी अबूधाबीत सराव सुरु आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप स्पर्धेसाठी आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू जॉन मूनी यांची राष्ट्रीय संघाच्या नव्या फिल्डिंग प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती खूपच महत्त्वाची असणार आहे. कारण अफगाणिस्तानचा संघ टी20 ट्राय सिरीजनंतर सप्टेंबरमध्ये टी20 आशिया कप स्पर्धा खेळणार आहे. अफगाणिस्तान स्पर्धेत उलटफेर करण्यासाठी ओळखली जात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने फिल्डिंगची बाजू भक्कम केली तर प्रतिस्पर्धी संघांना अडचणीत आणू शकते.
43 वर्षीय जॉन मूनी यापूर्वी अफगाणिस्तानचा फील्डिंग कोच होता. त्याने 2018 ते 2019 या कालावधीत अफगाणिस्तान संघासोबत ही भूमिका बजावली आहे. मूनीजवळ प्रशिक्षणाचा चांगला अनुभव आहे. 2019 मध्ये वेस्ट इंडिज संघासोबत काम केलं आहे. या वर्षी जानेवारीमध्ये आयर्लंडच्या महिला संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तान संघासोबत काम करणार आहे. मूनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 64 वनडे आणि 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 2007, 2011 आणि 2015 वनडे वर्ल्डकप, तर 2009 आणि 2010 टी20 वर्ल्डकप खेळला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नव्या फिजियोथेरेपिस्टची घोषणा केली आहे. निरमलन थनाबालासिंगम यांची या पदावर नियुक्ती केली आहे. ते संघ खेळाडूंना फिटनेस आणि दुखापतग्रस्त झाल्यावर कसं मॅनेज करायचं याबाबतचे धडे देणार आहेत. मूनी आणि थानाबालासिंगम दोघेही अफगाणिस्तान संघासोबत जोडले जाणार आहेत. 29 ऑगस्टपासून युएईत ट्रायसिरिज होणार आहे. या ट्रायसिरीजमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई हे संघ सहभागी होणार आहे. आशिया कप स्पर्धेच्या दृष्टीने संघांना चांगली तयारी करता येणार आहे.