तळसंदे (ता. हातकणंगले) येथे रेणुका हॉटेल समोर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता.
मात्र, या अपघातातील गंभीर जखमी असलेला विनेश कुमार हा तिसरा मजूरही उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. त्यामुळे या घटनेत तिघा परप्रांतीय मजुरांचा बळी गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात प्राण गमावलेले नरेंद्रकुमार यादव (वय २५, रा. बिहार),हेमंत पहाडी (वय २६, रा. चंद्रापाडा, ओडिशा),विनेशकुमार (वय २७, रा. चंद्रापाडा, ओडिशा, सध्या रा. कराड, जि. सातारा) गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास हे तिघे मोटरसायकलवरून (एम.एच.१०-ए.बी-४२२८) वाठारमार्गे कराडकडे निघाले होते.
दरम्यान, रेणुका हॉटेल समोर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोटरसायकलचा चक्काचूर झाला. तर तिघेही रस्त्यावर फेकले गेले. नरेंद्रकुमार यादव व हेमंत पहाडी हे जागीच ठार झाले. गंभीर जखमी विनेशकुमार याला तातडीने कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघाताची नोंद वडगाव पोलिसांत झाली असुन सहा.फौजदार एकनाथ गावंडे तपास करत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाठार-वारणानगर मार्गावरील सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.