गिल भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्त झाला आहे. आता तो 2027 च्या वर्ल्डकपपर्यंत वनडे खेळणार की नाही, यावर चर्चा सुरू झाली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो वनडे मालिकेत खेळताना दिसू शकतो. मात्र या मालिकेनंतर रोहित वनडेतूनही निवृत्ती जाहीर करेल, अशा चर्चेलाही जोर आला आहे. याबाबत रोहित शर्मा किंवा बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
रोहित शर्मा निवृत्त झाल्यावर भारताच्या वनडे संघाचा पुढचा कर्णधार कोण होईल, यावर क्रिकेट तज्ज्ञांमध्ये चर्चा रंगली आहे. अनेक माजी खेळाडू आपापली भाकीते करताना दिसत आहेत. त्यात माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानेही आपले मत मांडले आहे.
भारताच्या वनडे संघाचा पुढचा कर्णधार कोण?
रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या वनडे कर्णधारपदासाठी सर्वात पहिले श्रेयस अय्यरचे नाव समोर आले होते. बीसीसीआय लवकरच अय्यरला वनडे संघाची धुरा सोपवणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व बातम्या बोर्डाने स्पष्ट शब्दांत नाकारल्या. दरम्यान, कसोटी संघाचे नेतृत्व आधीच मिळालेला शुभमन गिलही या शर्यतीत पुढे येताना दिसत आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच गिलला भारताच्या कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली असून, वनडे कर्णधारपदासाठी त्याचे नावही जोरदार चर्चेत आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या मते हार्दिक पांड्या वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून अनेक चमत्कार घडवून आणू शकतो.” रैनाच्या मते, पांड्याकडे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासारखा अनुभव आणि कौशल्य आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत पांड्या उत्कृष्ट आहे.
रैना पुढे म्हणाला की, “पांड्या खूपच पॉझिटिव्ह व्यक्तिमत्त्वाचा आहे. तो ज्या पद्धतीने खेळतो त्यामुळे तो खऱ्या अर्थाने खेळाडूंचा कर्णधार आहे. त्याच्या खेळात मला थोडा माही भाई (महेंद्रसिंग धोनी) दिसतो, विशेषतः मैदानावर तो ज्या पद्धतीने संवाद साधतो, त्यातून मला त्याची एनर्जी खूप आवडते.”




