महायुती सरकारने विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी सुरू केलीली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली. या योजनेमुळेच महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हप्त्याबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला. लाडक्या बहिणींसाठी ही एक रक्षाबंधनाची भेट ठरली. जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत. मात्र, ऑगस्ट महिना संपला तरी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.
26 लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी
लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसताही अनेक महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर आता पुन्हा अर्जांचीची छाननी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.
छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील.