खासगी फोटो आणि व्हिडीओ पतीच्या मोबाईलवर पोहोचवल्यामुळे संसार उद्ध्वस्त होत असल्याच्या मानसिक तणावाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना १० ऑगस्ट रोजी येरवडा येथील आदर्श सोसायटी, रामनगर येथे घडली. अलिकडील एका घटनेत खासगी फोटो व्हायरल केल्याने एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
भरोसा सेलच्या समुपदेशनामुळे ती आत्महत्येपासून परावृत्त झाली.विवाहितेच्या वडिलांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज रविंद्र पाटील, रुपाली पाटील या दाम्पत्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचे पती हे भारतीय लष्करात कार्यरत आहेत. घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे.
त्यामध्ये स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, माझ्या मृत्यूस पंकज पाटील आणि त्यांची पत्नी रुपाली पाटील हे दोघे जबाबदार आहेत. त्यांनी माझे खासगी फोटो व व्हिडीओ माझ्या नवऱ्याला पाठवले. त्यामुळे आमच्या नात्यात तणाव निर्माण होऊन माझे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे.



