ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ म्हणजे सणासुदीचा काळ मानला जातो. सध्या सर्वांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपती नंतर काही दिवसांनी नवरात्रीचा सण येईल. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल आणि मग ९ दिवस नवरात्र उत्सव साजरा होईल. नवरात्री नंतर दसरा आणि मग दिवाळी.. म्हणजेच काय तर हा सगळा सणांचा माहौल बघायला मिळेल. सण उत्सव आले कि चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्या मूळगावी जातात आणि मोठ्या उत्सवात सण साजरा करत असतात. परिणामी एसटी बस, रेल्वे खचाखच भरलेल्या दिसतात. अशावेळी प्रवाशांवर ताण वाढू नये, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काही स्पेशल गाड्या सुरु करण्यात येतात. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुंबईहून कोल्हापूरसाठी एक विशेष रेल्वेसेवा सुरु होणार आहे. या नव्या ट्रेनमुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
कधीपासून सुरु होणार मुंबई कोल्हापूर विशेष ट्रेन? Mumbai Kolhapur Special Train
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने मुंबई ते कोल्हापूर साठी 24 सप्टेंबर पासून विशेष रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हि स्पेशल ट्रेन 26 नोव्हेंबरपर्यंत धावेल आणि दोन्ही शहरांना जोडण्याचे काम करेल. मुंबई कोल्हापूर विशेष ट्रेन दर बुधवारी रात्री 10:00 वाजता कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01:30 वाजता मुंबईत पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन मुंबईहून दर गुरुवारी दुपारी 02:30 वाजता कोल्हापूरच्या दिशेने रवाना होईल आणि शुक्रवारी पहाटे 04:20 वाजता कोल्हापुरात पोहचेल. विशेष बाब म्हणजे स्पेशल गाडीला मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. मुंबई ते कोल्हापूर ट्रेन (Mumbai Kolhapur Special Train) हि संपूर्ण पश्चिम महाराष्टातून धावणार असल्याने, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील लोकांनाही या रेल्वेचा फायदा होणार आहे.
कोल्हापूरकरांसाठी आणखी एक ट्रेन?
सणासुदीच्या काळात कोल्हापूरकरांसाठी आणखी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोल्हापूर – कलबुर्गी असं या स्पेशल ट्रेनचे नाव आहे. हि ट्रेन शुक्रवार सोडून आठवड्यातील इतर ६ दिवस धावेल. तिच्या वेळापत्रकाबाबत सांगायच झाल्यास, हि ट्रेन कोल्हापुरातून सकाळी 06:10 वाजता सुटेल आणि दुपारी 04:10 वाजता कलबुर्गीला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात संध्याकाळी 06:10 वाजता कलबुर्गीतून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05:40 वाजता कोल्हापुरात दाखल होईल.



