मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ हे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळामुळे डाग लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. छगन भुजबळांना आवर घालण्याची किंवा त्यांना तुरुंगात पाठवावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर वैयक्तिक टीका केली. छगन भुजबळ यांना नाव आणि प्रसिद्धीची खूप मस्ती आहे. ते सरकारसाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत. भुजबळ सरकाला पद्धतशीरपणे अडचणीत आणत आहेत. जोपर्यंत भुजबळ आहेत, तोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाज एकत्र येऊ शकत नाही. सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा हा माणूस मोठा नाही. त्याचे पाय धरा, खाली आपटा आणि त्याला तुरुंगात जाऊ द्या,” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटबाबत भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर भाष्य केले. तुम्ही जीआरवर नाराज असाल तर महाराष्ट्रात राहू नका, हिमालयात निघून जा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी जर मोठ्या मनाने ओबीसींसाठी उपस्थिती गठीत केली असेल, त्या उपसमितीने आणि उपसमितीच्या सदस्यांनी, जातीजातीमध्ये भांडण लावण्यापेक्षा त्या उपसमितीचा फायदा गोरगरीब ओबीसीच्या योजना राबवण्यासाठी केला पाहिजे. ओबीसीची उपसमिती झाली म्हणजे मराठ्याच्या विरोधात गरळ ओकायला नको किंवा मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन खोटे निर्णय घेणे हे व्हायला नको, असा टोलाही मनोज जरांगेंनी लगावला.
माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ओबीसी उपसमिती लोकांना जातीवाद वाटू नये. तसेच मराठा उपसमितीमध्ये आणि ओबीसी उपसमितीमध्ये जातीवाद वाटू नये त्यासाठी मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमिती या दोन्हीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे मंत्री असावेत. ओबीसींच्या उपसमितीमध्ये फक्त ओबीसी आणि मराठा उपसमितीमध्ये फक्त मराठा असा दुजाभाव नसावा. यावर सुद्धा बारकाईने लक्ष मुख्यमंत्र्यांनी ठेवलं पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
यात महत्त्वाचा म्हणजे जास्तीचं लक्ष छगन भुजबळ यांच्यावर ठेवलेलं बरं कारण मराठा आणि ओबीसी आता कुठेतरी एक होतोय. देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळामुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. मराठवाड्यातील मराठा समाज शंभर टक्के कुणबी असून, हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे त्यांना तातडीने प्रमाणपत्रे द्यावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अभियानाप्रमाणे ही प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी सुरू झालेल्या प्रक्रियेचेही मनोज जरांगेंनी कौतुक केले आहे.