महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत संजय राूत, अनिल परब हेही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवादरम्यान ठाकरे बंधूंची भेट झाली होती, त्यानंतर आज पुन्हा शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज व उद्धव यांची भेट होत आहे.
ठाकरे बंधूंची ही भेट अचानक नसून पूर्वनियोजित बैठक होती. दोन दिवसांपूर्वीच आजची बैठक ठरली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची असून त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. राजकीयदृष्ट्या ही भेट महत्वाची मानली जात आहे.
ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र कधी येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील याबाबत उत्सुकता आहे. त्यातच आज शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासोबत राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. आता खऱ्या अर्थाने दोन राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू होऊ शकते.
मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका या दृष्टिक्षेपात आहेत, त्यासाठी अवघा तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी कसून सुरूल केली आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडीचे पक्ष असो, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन महापालिका निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सविस्तर चर्चा केली.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे महापालिका निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार आहेत, अशी स्पष्ट कल्पना उद्धव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली अशी माहिती समोर आली.
आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दुसऱ्यांदा येत आहेत. गणेशोत्सवादरम्यान पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज यांच्या निवासस्थानी आले होते. अनेक कौटुंबिक कार्यक्रमात हे दोन्ही बंधू एकत्र पहायला मिळाले. मात्र आजची त्यांची भेट कौटुंबिक नसून राजकीय आहे, त्यात काय चर्चा होते आणि राजकीय पातळीवर या दोघांची युती कधी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.